राहुरी : प्रतिनिधी -
राज्यातील चोऱ्या , घरफोड्यामधील सोने जप्तीसाठी आरोपी , सराफ , पोलीस , सोने जप्ती यात अनेक घटना समोर आलेले आहेत . या पार्श्वभूमीवर गृह विभागाने नुकतीच 16 मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे .
चोर्या , घरफोडी, लूटमारीच्या तपास करताना सराफ व्यावसायिकांना चौकशीच्या नावाखाली सोबत येण्यासाठी पोलिस पथकाने, तपास अधिकाऱ्याने जबरदस्ती करू नये. दुकानातच त्यांचा जबाब नोंदवावा, कायदेशीर कर्तव्यावरील पोलिसांनीच कारवाईत सहभागी व्हावे व पुरेसे पुरावे असल्यावरच अटक करावी, असे स्पष्ट आदेशच गृहविभागाने पोलिसांना दिले आहे. राज्याचे उपसचिव राजेश गोविल यांनी नुकतेच १६ मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले.
बहुतांशी प्रकरणात घरफोडी, लूटमारीमध्ये लुटलेले सोने, चांदीचे दागिने चोर ठराविक सराफ व्यावसायिक, दुकानदारांना विकतात. व्यावसायिकांकडून ते दागिने तत्काळ वितळविले जातात. पोलिसांकडून गुन्ह्याची उकल झाल्यास ते दागिने विकत घेणाऱ्या सराफाला आरोपी करण्यात येते. त्यातील कलम जामीनपात्र असले तरी अशा गुन्ह्यांच्या तपासात अनेकदा निर्दोष सराफांचा छळ होतो. याशिवाय दोषी सराफांना कायद्याच्या पलीकडे जाऊन पैसे, सोने मागितल्याचा आरोपही राज्यात अनेक घटनांमध्ये झाला.
याबाबत गृहविभाग तसेच पोलिस महासंचालक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर गृहविभागाने गुरूवारी याबाबत आदेश जारी केले. त्यात सराफ व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिस महासंचालक पातळीवर एक राज्यस्तरीय दक्षता समिती तर प्रत्येक जिल्हा, पोलिस आयुक्तालय पातळीवर दक्षता समिती स्थापून तीन महिन्यांनी बैठक घेण्याचे आदेश आहेत.
अनेक गुन्ह्यांत सोने जप्त करूनही सराफा व्यापाऱ्याला आरोपी केले जात नाही. त्यामुळे चोरीचे सोने जप्तीदरम्यान अफरातफर केल्याचे गंभीर आरोप पोलिसांवर झाले. शासनाच्या या निर्णयामुळे आता हे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सराफ व्यावसायिकाकडे पोलीस गेल्यास -
* व्यावसायिकाकडील नोंदवहीमध्ये पोलिस अधिकाऱ्याने दुकानात गेल्याचे कारण, गुन्ह्याची माहिती नोंदवून सही करावी.
* कायदेशीर कर्तव्यावरील पोलिसांनीच कारवाईत सहभागी व्हावे.
* सराफ व्यावसायिकाचा जबाब शक्यतो दुकानातच नोंदवावा, त्याला पथकासोबत येण्याची जबरदस्ती करू नये.
* पुरेसा पुरावा असल्यास व आवश्यक असेल तरच अटकेची कारवाई करावी.
* सराफ व्यावसायिकांच्या संघटनेचे प्राधिकृत व्यक्तींना झडतीच्या वेळी हजर ठेवावे.
* तपासात सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नका.
सराफांसाठीदेखील
सराफ व्यावसायिकांना माहिती
* सराफ व्यावसायिकांनी दागिने, वस्तू विकण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे ओळखपत्राची छायांकित प्रत घेऊन नोंदवहीमध्ये नोंद करावी.
* तपास अधिकाऱ्याने विचारणा केल्यास पुढील ५ दिवसांमध्ये व्यावसायिकांनी या माहितीसह खुलासा सादर करावा.
* चोरीचे साहित्य कोणी घेऊन आल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे.
Post a Comment
0 Comments