अहिल्यादेवीनगरचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजाताई मुंडे
अहिल्या नगर - विशेष वृत्त
(प्रतिनिधी)
लोकनेत्या पंकजा मुंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले.
पंकजा मुंडे यांचे काल रात्रीच आगमन झाले असून त्यांनी बुऱ्हानगर येथील शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला.
यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शविले. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यांनतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले.
तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments