राहुरी - विशेष वृत्त
यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास दहा लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खाजगी कारखान्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला आहे .
दिवाळीनंतर सुरू झालेला हंगाम हा सर्वांनाच वेगवेगळ्या समस्याना सामोरे जाऊन हंगाम यशस्वी करण्यासाठी गेला . नगर जिल्ह्यातील 22 साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू राहिले . यात 13 सहकारी तर नऊ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश राहिला .
राहुरी तालुक्यात यंदा उसाचे उत्पादन 10 लाख मॅट्रिक टनहून अधिक झालेले होते . तालुक्यातील एकमेव खाजगी प्रसाद शुगर्सने आज अखेर पाच लाख 55 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . तर पाच लाख 63 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे . प्रसाद शुगर कारखान्याचा सरासरी साखर उतारा 9.85% इतका असून सध्या प्रसाद शुगर्स कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे .
राहुरी तालुक्यातील जवळपास दहा लाख मेट्रिक टन ऊस विविध साखर कारखान्यांनी आपापल्या कारखान्यात तोडून गाळप केला आहे . यंदाच्या वर्षी अशोक , संगमनेर , प्रवरा , मुळा व अन्य साखर कारखान्यांनी राहुरी येथील ऊस नेला आहे .अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना 2700 रुपयांपर्यंत पहिला हप्ता दिलेला आहे . मागील वर्षी झालेल्या बऱ्यापैकी पावसाने उसातचे उत्पादन चांगले झाले होते. यंदाच्या वर्षी उसाच्या शेतीला कालव्यांचे आवर्तन कमी प्रमाणात मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत , असे असताना यावर्षी 2024 मध्ये विविध हवामान विभागाकडून चांगल्या पावसाचे संकेत येत आहेत . त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments