राहुरी- विशेष वृत्त
37 अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी 223 राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी , कर्मचाऱ्याव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत . एकूण 1 हजार 700 हून अधिक अधिकारी , कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे . जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील , निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर , निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी , नायब तहसीलदार सचिन औटी ( संजय गांधी योजना ) पुनम दंडिले ,महसुल नायब तहसिलदार तसेच निवडणूक शाखेचे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख व राहुरीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे , (ग्रामीण भाग) , राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे (नगरपालिका क्षेत्र) यांच्यासह निवडणूक शाखेचे अनिल टेमक , प्रमोद वाघमारे , सनी लोखंडे आदी यात जातीने लक्ष देऊन आहेत .
निवडणूक लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेने व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व या काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातील 3 तालुक्यांमध्ये विविध प्रकारची 16 पथके तैनात करण्यात येणार असून याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांना पैशाचे आमिष , अवैधरित्या रोख रक्कम व अवैध साहित्याची वाहतूक व अन्य बेकायदेशीर बाबींना आळा घालण्यासाठी विशेष पथकांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्हिडिओग्राफर असे हे पथक संपूर्ण मतदारसंघातील 28 सेक्टर मध्ये फिरती राहणार आहेत . याशिवाय वांबोरी , मुळा डॅम फाटा आणि मिरी (ता- पाथर्डी ) येथे तपासणी नाका राहणार आहे .
स्टॅटिक सर्विलन्स टीमची 6 पथके , फ्लाईंग स्क्वाड टीमची 6 पथके , व्हिडिओ सर्विलन्स टीमची 3 तर व्ही. व्ही .टी. चे तीन आणि अकाउंटिंगचे एक पथक या संपूर्ण निवडणूक काळात 24 तास कार्यरत राहणार आहे .
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक चार चाकी वाहनातील मोठ्या रकमा याच भरारी पथकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या . त्यावेळी अनेकांना पुरावे सादर करायला नाकी नऊ आले होते .
एकंदरीतच 18 एप्रिल पासून अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राहुरी मतदार संघातील राहुरी ( 178 मतदान केंद्र ), नगर ( 70 मतदानकेंद्र ) , पाथर्डी ( 59 मतदानकेंद्र ) तालुक्यात या भरारी पथकांची नजर मात्र 307 मतदार केंद्राभोवती आतापासूनच असणार आहे .
Post a Comment
0 Comments