राहुरी- विशेष वृत्त
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता आज दि. ७.४.२०२४ रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघाच्या स्तरावर आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाला तब्बल 120 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली
२२३ - राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह व सावित्रीबाई फुले विद्यालय येथे दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते.
प्रथमतः निवडणूक विषयक प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत खास तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण व्हिडीओचा व पॉवरपॉईंट सादरीकरणाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. सदर प्रशिक्षण राहुरीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी दिले.
त्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यास मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले व सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या वेळी दाखविण्यात आलेला व्हिडीओ शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी तयार केला होता. तर सादरीकरण हे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी तयार केले होते. सदर प्रशिक्षणास उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांचा एक स्वतंत्र व्हाट्स अँप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर प्रशिक्षण विषयक साहित्य व व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांना केंद्राध्यक्ष निदेशपुस्तक व इतर साहित्य यावेळी वाटप करण्यात आले.
अहमदनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी राहुरी येथे उपस्थित राहून प्रशिक्षणास भेट देऊन उपस्थितांस मार्गदर्शन केले.
राहुरी येथील प्रथम प्रशिक्षणास एकूण १४७८ इतके मतदान अधिकारी / केंद्राध्यक्ष हजर होते तर १२० जण गैरहजर होते. प्रशिक्षणाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका नेमण्यात आली होती.
सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाकरिता राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पूनम दंडीले, संध्या दळवी, विशाल सदनापूर व सचिन औटी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी सर्व सेक्टर अधिकारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments