वाढदिवस अहमदनगरच्या रेल्वेस्थानकाचा !
नगर - विशेष वृत्त
अहमदनगर शहराचा 'स्थापना दिन' (२८ मे) इतिहासात नोंदवला गेला आहे, तशीच जन्मनोंद इथल्या रेल्वेस्थानकाची आहे. अहमदनगरच्या रेल्वेस्थानकावरून पहिली आगगाडी धावली, तो दिवस होता १७ एप्रिल १८७८. या रेल्वेस्थानकाचा १४६ वा वाढदिवस !
सन १८५३ मध्ये भारतात सर्वप्रथम मुंबई-ठाण्यादरम्यान देशातील पहिली रेल्वे सुरु झाल्यानंतर २५ वर्षांतच अहमदनगर रेल्वेच्या नकाशावर आलं.
तब्बल १९७ किलोमीटर लांब आणि १९ स्थानकं असलेला दौंड-मनमाड रेल्वेमार्ग केवळ वर्षभरात तयार झाला! या मार्गावरच्या अहमदनगर रेल्वेस्थानकाची इमारत अवघ्या ३५ हजार रूपयांत बांधून पूर्ण झाली होती. या रेल्वेमार्गाच्या मातीच्या भरावाचं काम फेब्रुवारी १८७७ मध्ये सुरू झालं आणि १७ एप्रिल १८७८ या दिवशी पहिली गाडी धावलीही!
इतक्या कमी वेळात आणि कमी खर्चात हे काम होऊ शकलं ते केवळ दुष्काळामुळं! शेतात पिकं नव्हती, हाताला काम नव्हतं, खायला अन्न नव्हतं. त्यामुळे नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो नागरिक रेल्वेच्या मातीभरावाच्या कामासाठी स्वस्तात उपलब्ध होऊ शकले. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी मजुरांना पोटापुरते जोंधळे मिळायचे.
या रेल्वेस्थानकाची चिरेबंदी दगडांत बांधलेली वास्तू अजून शाबूत आहे. नव्यानं बांधलेली स्वागत कमान, आवारात आणून ठेवलेला नगरची लष्करी ओळख बनलेला विजयंता रणगाडा, दगडी कोळसा आणि पाण्याच्या वाफेवर चालणारं आकाशात धुराच्या काळ्या रेघा ओढणारं झुकझुकगाडीचं जुनं इंजिन, विशाल आकाराचा तिरंगा यामुळं नगरचं रेल्वेस्थानक आता पर्यटनस्थळ बनलं आहे. स्वच्छतेत या स्थानकानं देशपातळीवर लौकिक मिळवला आहे. कारंजी, गोदावरी उद्यान, बालोद्यान, जाॅगिंग ट्रॅक आणि विद्युत रोषणाईमुळं या रेल्वेस्थानकाला नवी झळाळी मिळाली आहे. मुंबई, दिल्ली, जम्मू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद असं कुठंही तुम्ही इथून जाऊ शकता.
घोड्याचे टांगे हे एकेकाळी नगरचं वैभव होतं. रेल्वेतून उतरलं, की स्वागताला टांगेवाला हजर असायचा. आता हे दृश्य दुर्मीळ झालं आहे. माळीवाडा एसटी स्टॅंड ते रेल्वेस्टेशन अशी "येलूरकर सायकल सर्व्हिस" लोकप्रिय होती. तीही आता काळाच्या पडद्याआड गेली आहे...
दिवंगत डाॅ. शशी धर्माधिकारी यांनी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून अहमदनगरच्या रेल्वेस्थानकाची दुर्मीळ छायाचित्रं असलेली पोस्टकार्डस् मिळवली होती. त्यांच्या 'असे होते नगर' या पुस्तकात ती प्रकाशित करण्यात आली आहेत. अलेक्झांडर इझाट हा इंजिनिअर रेल्वेखात्यात असताना त्याच्यावर दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचं काम सोपवण्यात आलं होतं. त्यानं तेव्हा काढलेल्या फोटोंवरून सन १९०० मध्ये ही पोस्टकार्ड प्रकाशित करण्यात आली होती.
रेल्वेस्थानकापासून नगर शहरात येणारा रस्ता एकेकाळी राजपथ भासावा, असा देखणा होता. दुतर्फा चिंचेची झाडं, साखळ्या लावलेला प्रशस्त पदपथ आणि देशात प्रथमच बांधण्यात आलेला आठ धनुष्याकृती कमानींचा, उत्तम नट-बोल्टनं तयार केलेला सीना नदीवरचा लोखंडी पूल यामुळं या रस्त्यानं जाणं अगदी आनंददायक वाटायचं.
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे दिग्गज नेते नगरला आले, तेव्हा त्यांच्या पायधुळीनं हे रेल्वेस्थानक पावन झालं.
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारात सगळ्या नगरकरांना अभिमान वाटावा, असा संगमरवरी शिलालेख आहे. १९६५ मध्ये झालेलं भारत-पाकिस्तान युद्ध जिंकण्यासाठी मोठा धोका पत्करत शत्रूच्या हद्दीत शिरून ज्यांनी विमानातून छायाचित्रं काढली, ते वीरचक्र पुरस्काराने सन्मानित निवृत्त एअर कमोडोर गोपाळकृष्ण गरूड यांचं नांव या शिलालेखावर कोरलं आहे. ते मूळचे पारनेर तालुक्यातील कान्हूरपठारचे. त्यांना मिळालेली पदकं, तसेच ध्वज गरूड कुटुंबियांनी आपल्या नगरच्या वस्तु संग्रहालयाला दिला आहे.
रेल्वे कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढणारे, प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभं राहण्याचं धाडस दाखवणारे कामगार नेते डी. बी. कुलकर्णी आणि रेल्वे नफ्यात आणून कर्मचार्यांना भरघोस वेतनवाढ व बोनस देणारे, झेलम एक्सप्रेस सुरू कऱणारे आणि कोकण रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते हे नगरचेच सुपुत्र. त्यांची आठवण नगरच्या रेल्वेस्थानकानं जपायला हवी...
पर्यटकांना आकर्षित करणार्या भुईकोट किल्ला, बागरोजा, फराहबख्क्ष महाल, सलाबतखान मकबरा, दमडी मशीद यासारख्या कितीतरी ऐतिहासिक आणि विशाल गणेश मंदिर, मेहेराबाद, आनंदधाम, दत्त देवस्थानसारख्या अनेक धार्मिक वास्तू, तसंच सामाजिक कार्याचा मानदंड निर्माण करणार्या स्नेहालयसारख्या संस्था नगरमध्ये आहेत. पद्मश्री डॉ. पोपटराव पवारांचं हिवरे बाजार जवळच आहे. तथापि, हे सगळं रेल्वेगाड्यांमधून जाणार्या-येणार्या हजारो प्रवाशांना आपण कधी सांगणार आहोत? छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव रेल्वेस्थानकावर गाडी येताच वेरूळ, अजिंठा पाहण्यासाठी इथं उतरा, अशा उदघोषणा ऐकू येतात. नगरमध्ये मात्र "आशियातलं पहिलं रणगाडा संग्रहालय बघण्यासाठी तुम्ही इथं उतरू शकता", हे रेल्वेस्थानकावरच्या अनाऊन्समेंटमध्ये सांगितलं जात नाही.
अहमदनगर रेल्वेस्थानकावरच्या सर्व प्लॅटफॉर्मवर सहज नजरेस पडतील, अशा मोठ्या आकारात शहर परिसर अणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सचित्र माहिती असलेले फलक लावता येऊ शकतील. देशभरातील अनेक रेल्वेस्थानकांवर आणि विमानतळांवर असे कितीतरी भव्य पोस्टर आणि होर्डिग्ज झळकत असतात, त्या शहरात मिळणार्या वस्तूंचं मार्केटिंग केलं जातं असतं. नगरमध्ये असं काही का होत नाही?
नगरच्या रेल्वेस्थानकावर उतरल्यावर पर्यटकांना माहिती देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी 'पर्यटक माहिती केंद्र' (बूथ) उघडायला हवं. तिथं टुरिस्ट मॅप, लहान लहान पुस्तिका, फोटो, चित्रं आणि भेटवस्तू उपलब्ध करायला हव्यात. अधिकृत टूर गाईडची नावे आणि संपर्क क्रमांक तिथं लावायला हवेत.
नगर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांनी रेखाटलेले चित्र देशातील एका मोठ्या विमानतळावर लावण्यात आलं आहे. नगर रेल्वेस्थानकाचं सुशोभीकरण करतानाही स्थानिक कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करता येतील. नगरचा ऐतिहासिक वारसा सर्वांना उमगेल, असं डिझाईन दर्शनी भागाचं करायला हवं. रेल्वेस्थानक बघताच नगरची आठवण यावी, असा इथल्या मातीचा आणि संस्कृतीचा स्पर्श या वास्तूला व्हावा...!
नगरचा आणि रेल्वेस्थानकाचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास केला, तर शहराबरोबर रेल्वे प्रशासनालाही लाभ होईल. त्यांची प्रवासी संख्या वाढेल. नगरमधील हॉटेल व्यावसायिकांचं आणि व्यापार्यांचं उत्पन्न वाढेल. नगरमध्ये दुसरा मोठा उद्योग नाही आला, तरी तरूणांच्या हाताला काम उपलब्ध होऊ शकेल. त्यातून नगरचं रंगरूप बदलण्यासाठी मदत मिळेल.
( माहिती स्त्रोत- अहमदनगर माध्यम समुह संग्रहित )
नगरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे 'नगर-पुणे-नगर" अशी इंटरसिटी गाडी सुरू होण्याची! दिवसभरात चार फेर्या या गाडीच्या व्हायला हव्यात. 'छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर - पुणे' आणि माळशेज घाटातून जाणारा 'अहमदनगर-मुंबई' हा नवा रेल्वेमार्ग लवकर झाला, तर नगरची औद्योगिक भरभराट होऊ शकेल. 'नगर- बीड - परळी'च्या तुलनेत तो नक्कीच फायदेशीर ठरेल, उत्पन्नही वाढेल. रेल्वेस्थानकाच्या माध्यमातून नगरकरांचं भाग्य उजळावं, एवढीच अपेक्षा...!
१७ एप्रिल १८७८ रोजी पहिली रेल्वेगाडी नगरच्या स्थानकावर आली, तेव्हा इथल्या सुवासिनींनी या 'अग्निरथा'ची पूजा केली होती. हा किस्सा जुन्या पिढीतले बापूराव कृष्ण डावरे रंगवून सांगत. आज कुणी साजरा करणार आहे का, दीड शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या नगरच्या रेल्वेस्थानकाचा वाढदिवस?
Post a Comment
0 Comments