राहुरी फॅक्टरी येथे येत्या १५ एप्रिल रोजी डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा महामेळावा घेणार
राहुरी - विशेष वृत्त
"राहुरी फॅक्टरी येथे येत्या १५ एप्रिल रोजी डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा महामेळावा घेणार आहे. त्यात, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या काळातील थकित वेतन व इतर कोट्यावधींच्या थकबाकीवर चर्चा होईल. आंदोलनाची दिशा ठरविली जाईल." असा इशारा राष्ट्रीय साखर कामगार युनियनतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला.
राहुरी फॅक्टरी येथे राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, कामगार नेते इंद्रभान पेरणे, युनियनचे सदस्य सिताराम नालकर, ईश्वर दुधे, बाळासाहेब तारडे, रावसाहेब ढूस, रामभाऊ ढोकणे, राजेंद्र गागरे, नामदेव शिंदे, सुनील म्हसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपाध्यक्ष दुशिंग म्हणाले, "राहुरी फॅक्टरी येथे येत्या १५ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात कामगारांचा महामेळावा आयोजित केला आहे. खासदार डॉ. विखे यांच्या काळात कामगारांचे १७ महिन्यांचे वेतन, दोन वर्षांचा बोनस व वेतन आयोगाचे दोन फरक अशी कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे."
"कामगारांनी थकीत वेतनासाठी तीन वेळा आंदोलने केली. प्रत्येक वेळी माझ्या काळातील कामगारांचा एक रुपयाही बुडवणार नाही. असा शब्द खासदार डॉ. विखे यांनी दिला. तो पाळला नाही. आम्ही भीक मागत नाही. आमच्या कष्टाचे थकीत वेतन मागत आहे. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे."
युनियनचे सचिव सचिन काळे म्हणाले, "जिल्हा बँकेतर्फे कारखाना जप्तीची कारवाई पूर्वनियोजित कट आहे. कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. थकित वेतन मिळण्यासाठी वेळोवेळी खासदार डॉ. विखेंची भेट घेतली. एकदा तर त्यांनी युनियनच्या शिष्टमंडळाला अपमानास्पद वागणूक दिली."
"मागील लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. विखेंच्या विजयात कामगारांचा मोलाचा वाटा आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. वेतनाची थकबाकी मिळावी. एवढीच मागणी आहे. महामेळाव्यापूर्वी कामगारांची थकबाकी द्यावी. अन्यथा, कामगारांनी विरोधात भूमिका घेतल्यास आगामी निवडणुकीत मतदार संघात फिरून अन्यायाचा पाढा वाचला जाईल." असेही काळे यांनी सांगितले. युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे यांनी आभार मानले.
यावेळी
पत्रकारांशी बोलतांना तनपुरे कारखान्याच्या कामगार युनियनचे सचिव सचिन काळे. समवेत अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दूशिंग आदी उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments