राहुरी बसस्थानक झाले 51वर्षांचे ; आता प्रतीक्षा नवीन बस स्थानकाची
राहुरी - विशेष वृत्त
राहुरीच्या बसस्थानकाच्या इमारतीला शनिवारी 25 मे रोजी 51 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आता नवीन बस स्थानक इमारत पुनर्बांधणीसाठी मुहूर्त लाभला आहे .
( राहुरी बसस्थानकातील संग्रहित छायाचित्र )
बरोबर 51 वर्षांपूर्वी 25 मे 1973 रोजी दिमाखामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन सदस्य व ज्येष्ठ नेते के डी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते . यावेळी आबासाहेब निंबाळकर हे अध्यक्षस्थानी होते . या बसस्थानकाचे कॉन्ट्रॅक्टर मेसर्स सी.एम. मुनोत अँड ब्रदर्स होते . कॉम्रेड पी बी पाटील त्यावेळी तत्कालीन राहुरीचे आमदार होते . सध्याच्या मोडकळीस आलेल्या बसस्थानकामध्ये 25 मे 1973 ची कोनशिला अजूनही या बसस्थानकाची ओळख करून देते .
शिर्डी - शनिशिंगणापूर व महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पर्यटक आणि नागरिकांसाठी राहुरी बसस्थानक एक केंद्रबिंदूच होता . आता 51 वर्षानंतर बहुचर्चित अशा राहुरी बसस्थानकाची लवकरच अद्ययावत पुनर्बांधणी होणार आहे .
बसस्थानकाच्या उत्तरेला नियंत्रण कक्षासह प्रवाशांसाठी शेडचे काम सुरू आहे . लवकरच बसस्थानकाच्या भव्य आणि दिव्य इमारतीचे काम सुरू होणार आहे . ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे , माजीमंत्री विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून या बसस्थानकाचे काम लवकरच होणार आहे .
वर्षभरापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बसस्थानकाची पुनर्बांधणी या अत्यंत महत्वाच्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष , व्यवस्थापकीय संचालक , उपमहाव्यवस्थपक (स्थापत्य) यांची भेट घेऊन पाठपुरावा करत सविस्तर चर्चा केली होती. नवीन बसस्थानकाचा आराखडा तयार असून बसस्थानकातील नियोजित दहा प्लॅटफॉर्मशिवाय अधिकचे दोन ते तीन प्लॅटफॉर्म वाढविण्यात येणारआहेत .
राहुरी तालुक्याच्या विस्तार मोठा आहे. त्यामुळे दररोज येथून राज्यभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. त्यादृष्टीने भव्य आणि सुसज्ज असे बसस्थानक असेल. राहुरी तालुक्यातील पोलीस स्टेशनसह पोलीस वसाहत , राहुरी महसूल प्रशासकीय इमारत , पंचायत समिती कॉलनी , ग्रामीण रुग्णालय इमारत , जलतरण तलाव ,या महत्त्वाच्या विषयांबरोबरच राहुरी बसस्थानकाचा प्रश्न मोठ्या काळापासून प्रलंबित आहे . या विषयांचा राजकीय काथ्याकूट 4 जून नंतर सुरू होणार आहे .
Post a Comment
0 Comments