Type Here to Get Search Results !

लोकप्रतिनिधी म्हणून खा. सुजय विखे नापास ठरले आहेत - ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात

 लोकप्रतिनिधी म्हणून खा. सुजय विखे नापास ठरले आहेत - ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार निलेश लंकेच्या प्रचारार्थ उंबरे येथे प्रचार सभा



राहुरी ( प्रतिनिधी )

     ‌‌ त्यांनी कधी बेरोजगारी, महागाई, शेतकरी व कामगारांचे प्रश्न संसदेत मांडले का ? खासदार मतदार संघात नसतात , संसदेत नसतात मग असतात कुठे ? शोध घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून खासदार डॉ. सुजय विखे नापास ठरले आहेत , असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले .

       ब्राह्मणी, उंबरे येथे शनिवारी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेत आमदार थोरात बोलत होते. आमदार प्राजक्त तनपुरे, लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावतीताई घोगरे, जयंत वाघ, अरुण कडू, बाबासाहेब भिटे, प्रकाश देठे आदी उपस्थित होते.

       आमदार थोरात म्हणाले, विखेंनी गणेश व राहुरी कारखाना बंद पाडला. त्यांना सत्ता व पैशांचा गर्व आहे. लोकांच्या कामासाठी नव्हेतर मजाहजा करण्यासाठी त्यांना खासदारकी हवी आहे. प्रवरेची यंत्रणा फिरते. त्यांचे चार महिन्यांचे पगार नाहीत. जिल्ह्यात सत्ता भोगली. तरी देशातील व राज्यातील नेत्यांच्या सभा घ्याव्या लागतात. यावरून लंकेंनी घाम फोडल्याचे स्पष्ट होते."

    कोरोनात जीवाची पर्वा न करता लंकेंनी गोरगरिबांचे जीव वाचविले. ते पारनेर पुरते मर्यादित राहिले नाही. लंकेंचा विजय सामान्य जनतेचा विजय असेल. तुतारी चिन्ह नवीन आहे. घरोघरी पोचवा , असे आवाहन थोरात यांनी केले. 

      आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, २०१९ साली जनतेने दक्षिणेच्या हुकूमशहाचे आक्रमण परतविले. आता उत्तरेच्या सत्ताधीशांचे आक्रमण परतविण्याची वेळ आली आहे. केंद्रातील व राज्यातील शेतकरी विरोधी सरकार हद्दपार करावे. संसदेत सामान्य जनता व शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी नीलेश लंके यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करावे .

      प्रभावती घोगरे म्हणाल्या, एकाच कुटुंबात जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मंत्रीपद सर्व सत्तांचे केंद्रीकरण झाले. सत्तेतून अमाप संपत्ती मिळविली. प्रवरेच्या सहकारी संस्थांचा खासगी प्रॉपर्टी सारखा वापर करीत आहेत. संस्थानिक असल्यासारखी डोक्यात हवा गेली आहे. पाहुण्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. मी सख्खी शेजारी आहे. हुकुमशाही, जुलूमशाहीचा अतिरेक थांबवला पाहिजे. लंकेंनी एल्गार पुकारला आहे. हक्काच्या माणसाला निवडून द्या. पाहुणा प्रवरेला पाठवा.

Post a Comment

0 Comments