महसूलची ओसरीच बनलीय राहुरी पोलीस स्टेशनचा आसरा
राहुरी - विशेष वृत्त
राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारातील महसूल विभागाची ओसरी आता पोलिसांचा जणू आसरा बनल्याचे चित्र सध्या दिसत आहे .
या ओसरीवरच सध्या छोटेखानी कुलूप बंद अशा खोल्या सर्वांच्या नजरेत भरत आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्या वाढ आणि नागरिकांच्या तक्रारीत वाढ होत असल्याने पोलीस स्टेशनचा कारभार करणाऱ्या पोलिसांना नागरिकांच्या तक्रारी , जबाब , वॉरंटच्या बाबी , जामीनदार , तक्रारदार अशा अनेक स्वरूपाची लेखी कायदेशीर विषय पोलिसांना या ठिकाणी करावे लागतात. त्यांना कायदेशीर कागदपत्र देखील जतन करून ठेवावी लागतात .
राहुरी तालुक्यात पोलीस रचनेतील अनेक बीट कार्यरत आहेत , मात्र तालुक्याचे ठिकाण असल्याने व पोलीस निरीक्षक यांचे कार्यालय असल्याने काही महत्त्वपूर्ण बाबींसाठी तालुक्याच्या ठिकाणीच पूर्तता करावी लागते . मात्र पोलीस स्टेशनला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने पोलीस स्टेशन समोरील महसूल विभागाची कार्यालयाची ओसरी आता याच पोलिसांना आसरा बनल्याचे चित्र दिसून येत आहे .
राहुरी मध्ये महसूल विभागाची भव्य प्रशासकीय इमारत, स्वतंत्र पोलीस ठाणे, दुय्यम कारागृह , पोलीस कर्मचारी निवासस्थानांच्या इमारतींचे कोट्यावधी रुपयांचे आराखडे व अंदाजपत्रक यापूर्वी तयार झाले आहेत . पण त्याचे पुढे काय झाले ? हा प्रश्न राहुरी तालुक्यात विचारण्यात येतो .
राहुरीतील मामलेदार कचेरी म्हणून १३० वर्षांची ओळख असणारी तहसील कचेरी गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहेत . तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, रजिस्टार ऑफिस, पुरवठा विभाग, दुय्यम कारागृह, ४ कोठड्या असलेले दुय्यम कारागृह , पोलीस कॉलनी हे सर्व ठिकाणी व एकाच भागामध्ये असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांची कोंडी होत आलेली आहे .
याप्रमाणे राहुरीत चार मजली भव्य प्रशासकीय इमारत तसेच अद्ययावत पोलीस स्टेशन , महिला कोठडी व न्यायालयीन कोठडी सह अन्य पोलिस कोठडी असलेले दुय्यम कारागृह , आणि पोलिसांचे निवासस्थान , अशा स्वतंत्र इमारतींच्या आराखड्याचा यात समावेश होता .
पोलीस निरीक्षकांचे ऑफिस हिरवेगार --
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार हिरवेगार दिसत असून पोलीस निरीक्षक यांच्या दालनात पूर्वी समोरून प्रवेश व्हायचा , नागरिकांनाही दिसून यायचे . मात्र या हिरव्यागार अच्छादनामुळे नागरिकांसह सर्वांनाच उत्तरेकडील भागातून आत येऊन प्रवेश करावा लागतो . याचे मात्र सर्वत्र कुतूहल होत आहे .
पोलीस स्टेशन आवारात पाहुण्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी टपरी --
राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारातील पोलीस कोठडी च्या बाजूला असलेल्य एक निळी केबिन तयार करण्यात आलेली आहे . ही निळी केबिन म्हणजेच टपरी वजा कार्यालय आहे .
बाहेरून आलेल्या तपासी पोलीस अधिकारी तथा न्यायालयीन व कायदेशीर कामासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही केबिन सध्या वापरात आहे . मात्र ही केबिन नव्हे तर टपरी असल्याचे येथील पोलीस वर्तुळात उपहासात्मक म्हटले जात आहे.
बहुचर्चित राहुरीच्या भव्य प्रशासकीय इमारतीसह अद्ययावत पोलीस स्टेशन , पोलिसांचे निवासस्थान व दुय्यम कारागृह राहुरीत कधी होणार ? राहुरी पोलिसांना त्यांचे हक्काचे निवासस्थान कधी मिळणार ? आणि या कामाचे घोडे अडले कोठे ? हा प्रश्न राहुरीकरांकडून विचारला जातो . विशेष म्हणजे महसूल विभागाचे अधिकारी ३ वर्षांनी बदलतात आणि मागील वर्षात ३ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत हे विशेष आहे . पोलिसांना आता नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी पोलीस स्टेशन समोरच महसूल विभागाच्या ओसरीचा आसरा घेण्याची वेळ आल्याने गेल्या अनेक वर्षापासून चा प्रलंबित हा प्रश्न कधी मार्गी लागणार हा प्रश्न कायम आहे .
Post a Comment
0 Comments