तर कचरा व्यवस्थापनावर होऊ शकतो परिणाम ; राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत वेधले लक्ष
राहुरी - विशेष वृत्त
वर्षभरापासून राज्यातील नगरपालिकांवर प्रशासक असल्याने पंधराव्या वित्त आयोगातील निधी प्राप्त होत नसल्याने राहुरी नगरपालिकेसह बहुतांश ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचे काम ठप्प पडत चालले असून राज्य शासनाने तात्काळ वेगळा निधी उपलब्ध करून तातडीने पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत केली .
तात्काळ हा निधी उपलब्ध न झाल्यास लवकरच कचरा व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होऊ शकतो ? असा इशारा देत तनपुरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले .
विधानसभेच्या कामकाजामध्ये एका लक्षवेधी दरम्यान तनपुरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला . आमदार तनपुरे म्हणाले की , राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे बऱ्याच नगरपालिकांमध्ये प्रशासक कारभार चालवत आहेत. प्रशासक असल्याने १५व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त होत नाही. बहुतांश नगरपालिकांमध्ये घन कचरा व्यवस्थापनाचा निधी १५व्या वित्त आयोगामार्फत येत असतो.
त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापनात अडथळे निर्माण होऊन त्याचा थेट नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शासनाला विनंती आहे की, त्यांनी यासाठी नगरपालिकांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा.
राहुरी नगरपालिकेला गेल्या १५ महिन्यांपासून शासनाच्या १५व्या वित्त आयोगाचा एक रूपया देखील आलेला नाही. मात्र राहुरी नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने आत्तापर्यंत कचरा व्यवस्थापनावर परिणाम झालेला नाही. परतु लवकरच शासनाचे पैसे आले नाहीत, तर पुढच्या काही महिन्यात कचरा व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्वच नगरपालिका नगरपंचायतीचे धोरण तयार केले जाईल , असे सांगत तात्काळ निधी कसा उपलब्ध करून द्यायचा यावर निर्णय घेतला जाईल अशी आश्वासन दिले.
Post a Comment
0 Comments