Type Here to Get Search Results !

खासदार निलेश लंके यांना तनपुरे यांनी दिला हा सल्ला

 नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करा

मा. खा. प्रसाद तनपुरे यांचा खा. नीलेश लंके यांना सल्ला

राहुरी : प्रतिनिधी


      नुकत्याच झालेल्या नगर लोकसभा निवडणूकीत तुम्ही यश मिळविले असून आता नगर-पुणे रेल्वेमार्गासह नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठीही पुढाकार घ्या असा सल्ला मा. खा. प्रसाद तथा बापूसाहेब तनपुरे यांनी खा. नीलेश लंके यांना दिला.

       लोकसभा निवडणूकीत विजय संपादन केल्यानंतर खा. लंके यांनी राहुरी येथील तनपुरे यांच्या फार्म हाऊसवर जात मा. खा. प्रसाद तनपुरे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. यावेळी तनपुरे कुटूंबियांच्या वतीने खा. लंके यांचा सत्कार करण्यात आला. राहुरी नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, सोनाली तनपुरे, सोहम तनपुरे आदी यावेळी उपस्थित होते.

        यावेळी बोलताना मा. खा. तनपुरे म्हणाले, संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी तनपुरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतील अनुभव खा. लंके यांच्याशी शेअर करीत पूर्वीच्या व सध्याच्या राजकारणामध्ये झालेल्या बदलाचीही त्यांनी तुलना केली.विखे कुटूंबासारख्या बलाढया शक्तीविरोधात तुम्ही लढत देऊन निवडणूक जिंकलात. यशाची ही घोडदौड अशीच सुरू ठेवा, तनपुरे परीवार आपल्या पाठीशी सदैव असेल अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली.

       नगर-मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसंदर्भात आपण अलिकडेच मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे खा. लंके यांनी यावेळी सांगितले. पुढील आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडकरी यांनी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत या रस्त्याच्या कामासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्‍वास खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केला. खा. लंके यांचे सहकारी तथा नांदूरपठारचे मा. उपसरपंच रविंद्र राजदेव यावेळी उपस्थित होते.


▪️फोटो ओळ


खासदार नीलेश लंके यांनी मा. खा. प्रसाद तनपुरे यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

Post a Comment

0 Comments