Type Here to Get Search Results !

कोतुळकडील मुळेला महापूर ; धरणाकडे 41 हजार क्युसेकने आवक

कोतुळकडील मुळेला महापूर ; धरणाकडे 41 हजार क्युसेकने आवक

राहुरी - सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त


                             ( संग्रहित फोटो )

मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टीने आज दुपारी तब्बल 41 हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे .

कोतुळकडील मुळा नदीला महापूर आला असून पुढील 24 ते 36 तासात धरणात झपाट्याने पाण्याची आवक होणार आहे .



धरण पातळी नियंत्रित करणेसाठी , पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाचा पूर नियंत्रण कक्ष एकंदरीत स्थितीकडे लक्ष देण्यासाठी सज्ज झाला आहे .

 मुळा धरणाच्या पाणलोटात दोन दिवसांपासून तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे . काल मुळा नदीकडे 20 हजार क्युसेकने होणारी आवक आज सकाळी वाढवून 23 हजार इतकी झाली होती . सकाळी नऊ वाजता त्यात वाढ होऊन 34 हजार 396 क्युसेकने वाढली , त्यात दुपारी बारा वाजता कोतुळकडील मुळा नदीला सहा मीटरने तब्बल 41 हजार 600 क्युसेक वेगाने आवक सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. गेल्या काही वर्षात ही सर्वाधिक विक्रमी आवक मानली जात असून पुढील 36 तासात धरणात झपाट्याने पाणी जमा होणार आहे . धरणाचा साठा 75% पर्यंत दुपारी पोहोचेल .


काय झाले होते त्यावेळी !!

मुळा धरणाकडील पाण्याची आवक पाहता राहुरीकरांसह नगर जिल्ह्याला 8 ऑगस्ट 2006 या दिवसाची आठवण झाल्याचे चित्र दिसून येत आहे .

2006 साली मुळा धरणाकडे अशाच पद्धतीने पाण्याची आवक झाली होती . धरणाच्या पाणलोटात तुफान पर्जन्यवृष्टी सातत्याने होत असल्याने मुळा धरणातून नदीपात्रात दोन ऑगस्ट  2006 ला पाणी सोडावे लागले .

 सहा ऑगस्ट २००६ रोजी धरणातून जायकवाडी कडे तब्बल 45 हजार क्युसेक पाणी सोडावे लागले होते . त्यावेळी नगर , नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाण्याचा विसर्ग जायकवाडी कडे झेपावत होता . या सर्वच धरणातून पाणी सोडताना जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधिकारी , कर्मचारी, पूर नियंत्रण कक्ष यांनी मोलाची कामगिरी बजावली होती . आजही लाभक्षेत्रातील नागरिकांच्या अंगावर शहारे येतात .

 त्यानंतर बहुदा प्रथमच मुळा नदीकडे चाळीस हजार क्युसेक अधिक पाण्याची आवक होत आहे . कोतुळ येथील जलमापन केंद्रावर 2006 ला सहा मीटर ला चाळीस हजार 820 इतकी जल मापनाची पाणी मोजण्याचे पट्टी होती . त्या पट्टीवरून त्यावेळी पाणी वाहिले होते . नंतर लहित खुर्द या ठिकाणी हे जलमापन केंद्र हलवण्यात आले होते . आज या जलमापन केंद्रावर सहा मीटरहून अधिक पाण्याची आवक झाल्याची नोंद झाली आहे , हे विशेष ! 

जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही . डी . पाटील , शाखा अभियंता आर . जे. पारखे यांच्यातील देखरेखीखाली धरणाचे पूर नियंत्रण पातळी चा स्टाफ धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहे .



Post a Comment

0 Comments