सांग सांग भोलानाथ शाळेचे पत्रे गळतील काय
शाळेचा फोटो
जोरदार पावसाने मुख्याध्यापक शिक्षकांच्या रूमसह वर्गांना गळती ; राहुरी तालुक्यातील लाख येथील प्रकार
राहुरी - विशेष वृत्त
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ! हे गीत सर्वश्रुत आहेच , पण आता सांग सांग भोलानाथ शाळेचे पत्रे गळतील काय ? असा सवाल शालेय विद्यार्थ्यांसह पालकवर्ग आज करत होता .
कारणही तसेच घडले, राहुरी तालुक्याच्या टोकाला 20 किलोमीटर अंतरावर असलेले आणि श्रीरामपूर मतदार संघात श्रीरामपूर पासून 20 किलोमीटर आंतर असलेले लाख या गावातील शाळेचे पत्र्याचे वर्ग दमदार पावसामुळे अक्षरशः गळत होते . एवढेच नव्हे तर मुख्याध्यापकांचे व शिक्षकांच्या स्टाफ रूम देखील पावसाच्या पाण्याने गळत होत्या .संत ज्ञानेश्वर विद्यालय लाख भाग शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना आज पावसामुळे बसण्यासाठी जागाही शिल्लक राहिली नाही. संपूर्ण वर्गांच्या पत्र्याची अगदी चाळण झाल्याने सर्व वर्ग पाण्यात होते.
डॉ. तनपुरे साखर कारखान्या अंतर्गत संलग्न असणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या राहुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी विद्यालय व महाविद्यालय आहेत . सध्या शिक्षण मंडळावर तालुका उपनिबंधक यांच्यावर असणारी प्रशासकीय प्रमुख जबाबदारी रिक्त असल्याचे सांगितले जाते आणि या शिक्षण मंडळाचा कारभार बेभरोसे असल्याचा आरोप केला जातो .शिक्षण मंडळाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही घटल्याची चर्चा आहे .
असे असताना लाख येथील शाळेच्या पत्र्यांच्या खोल्यांना पावसाने झालेल्या गळतीने ही लाख मोलाची बाब मात्र जगासमोर आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडल्याचे चित्र दिसून येत आहे . काही वर्षांपूर्वी पत्र्याच्या शाळेच्या खोल्या गळायच्या बातम्या यायच्या . आजच्या डिजिटल अत्याधुनिक युगातही ग्रामीण भागात हेच चित्र जर दिसत असेल तर हा डिजिटल जमाना काय कामाचा ? असा सवाल ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून केला जात आहे .
Post a Comment
0 Comments