Type Here to Get Search Results !

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला गळती बहुतांश नेते कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम, तनपुरेंचे बळ वाढले

 विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला गळती 



बहुतांश नेते कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम, तनपुरेंचे बळ वाढले 


राहुरी, दि. १० (प्रतिनिधी ) 

 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुका भाजपाला मोठी गळती लागलेली असून गेल्या तीन महिन्यांच्या आत किमान दीड डझनपेक्षा जास्त भाजपाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला. तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब अर्थात चाचा तनपुरे यांनी याच महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे तालुक्यातील भाजपाचे बळ घटले असून आगामी निवडणूक भाजपासाठी सोपी राहिलेली नाही याचे संकेत मिळत आहेत.


राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्राबल्य आहे. गेल्या निवडणूकीत या पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले यांचा निर्णायक पराभव केला होता. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तनपुरे यांना पहिल्या टर्ममध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत तनपुरे यांनी मतदारसंघातील सिंचन, वीज आदींसह विविध प्रश्न मार्गी लावले. याखेरीज स्वतः तनपुरे यांचा मतदारसंघाशी सातत्याने संपर्क राहिला आहे. महाविकास आघाडी सरकार पायऊतार झाल्यानंतर उलट त्यांनी सातत्याने दौरे आणि बैठका घेऊन मतदारसंघात आपला संपर्क अधिक वाढविला. याचे परिणाम दिसून येत असून तनपुरे यांच्याकडे इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचा ओढा निर्माण झाला आहे.  


भाजपाच्या ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत, संतोष अंत्रे, भाजपाचे ज्येष्ठ नेते गेणू तोडमल, संजय शिंदे, जनाब अफजल, केशवराव अंत्रे, सोमठाणे खुर्द चे सरपंच आणि भाजपाचे नेते पांडूरंग शिदोरे, बबन जाधव, शेखर कराळे, ताहाराबादचे पोपटराव किनराव,सुधाकर जागरे अशोक मुसमाडे, भीमराज बेलकर आणि शिवराज तांबे यांनी सप्टेंब महिन्यात भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याखेरीज भाजयुमोचे जिल्हा सरचिटणिस किरण अंत्रे, प्रशांत अंत्रे आणि सोनगाव ग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र अनाप यांनी ऑगस्टमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याच महिन्यात भाजपाचे नेते धीरज पानसंबळ यांनीही भाजपाला रामराम ठोकला आहे.   


गेल्या लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर भाजपा बॅकफूटवर आहे. त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला गळती लागली आहे. राहुरीत तर कर्डीले गटाची दाणादाण उडाली असून अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील भाजपाची साथ सोडली आहे. बहुतांश नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसरा घेतला आहे. यामुळे संभाव्य लढतीत प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढल्याचे चित्र असून भाजपाला झुंजावे लागेल अशी स्थिती आहे. कर्डीले गटात यामुळे अस्वस्थता पसरली आहे.

Post a Comment

0 Comments