म.वि.आ. सरकार असताना कर्डिले पवारांना त्यांच्या पक्षात घ्यायची विनंती करायचे ; आमदार प्राजक्त तनपुरेंचा गौप्यस्फोट
राहुरी - ( प्रतिनिधी )
महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवाजी कर्डिले वारंवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांना भेटून मला तुमच्या पक्षात घ्या ,अशी विनंती करायचे . असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांच्या होम ग्राउंड वर बुऱ्हानगर येथे बोलताना केला .
राहुरी व पाथर्डी तालुक्यासह अहिल्यानगर तालुक्यातही तुतारी चिन्ह जोमात आहे. कर्डिलेंना पराभव दिसू लागला आहे. कितीही आवाज दाबला तरी तुतारी वाजणारच आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यातही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असे तनपुरे यांनी सांगितले.
प्राजक्त तनपुरे म्हणाले की , मी माझ्या विरोधी उमेदवारच्या गावात बुर्हाणनगर येथे आलो. देवीच्या मंदिरात नम्रपणे माथे टेकवून नतमस्तक झालो . परंतु राहुरी येथे माझ्या गावात शनी मंदिरासमोर ज्युनियर कर्डिले यांनी काय अविर्भाव केले हे सगळ्यांनी पाहिले . मी देवासमोर नतमस्तक होतो , ते दंड-मांड्या ठोकतात , हाच आमच्यातील फरक आहे ,असे तनपुरे यांनी सांगितले.
अहिल्यानगर तालुक्यात आमदार तनपुरे यांनी दरेवाडी, सैनिक नगर, बाराबाभळी, आलमगीर, वारूळवाडी, कापूरवाडी, गजराज नगर, बुऱ्हाणनगर, वडारवाडी नागरदेवळे येथे झंझावाती प्रचार दौरा केला.
अभिषेक भगत, अमोल जाधव, गोविंद मोकाटे, रामेश्वर निमसे, झोडगे, राहुल ढोरे, उद्धव दुसिंगे, विलास काळे, रामदास ससे, अजय गुंड, कुणाल भगत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार तनपुरे म्हणाले की, बुऱ्हाणनगर येथे ग्रामस्थ श्वास कोंडल्यासारखे राहतात. कुणालाही मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याला अपवाद अभिषेक भगत, अमोल जाधव आहेत. मतदार संघाचा आमदार असताना येथील ग्रामस्थ माझ्याकडे यायला घाबरतात. येत्या दहा दिवसात सर्व ग्रामस्थांवरील दबाव संपवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे."
बुर्हाणनगर गावाला पिण्याचे पाणी देण्याचे ज्यांचे काम आहे. तेच आपल्या शेतातील विहिरीत पाणी योजनेची जलवाहिनी फोडून शुद्ध पाणी वापरत होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गावाच्या वाट्याचे पाणी स्वतःसाठी वापरणारे असे कसे नेतृत्व आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी योजनेत आपण काही बदल केले आहेत. योजनेतील घाटाखालील राहुरी व नगर तालुक्यातील खडांबे, धामोरी, देहरे, विळद गावांसाठी वेगळी योजना केली आहे. घाटावरील ग्रामीण भागातील गावांसाठी स्वतंत्र जलवाहिनी व बुर्हाणनगर, नागरदेवळे साठी स्वतंत्र जलवाहिनी केली आहे. भविष्यात बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतील सर्व गावांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमदार म्हणून पाच वर्षे कोणत्याही विरोधकाला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा कधीही विचार केला नाही. परंतु काही चांडाळ चौकडींना इशारा देतो. निवडणूक लोकशाही मार्गाने होऊ द्या. निवडणुकीचे दहा दिवस निघून जातील. निवडणूक भयमुक्त होऊ द्या. अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू. भविष्यात तुमचे नेते आमच्या पक्षात येतील, त्यावेळी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल .
Post a Comment
0 Comments