नगर येथील एका मतदान केंद्रावर प्राजक्त तनपुरे यांचा दुबार मतदानाचा आक्षेप ; गोंधळ, घोषणाबाजी नंतर पोलिसांना पाचारण
नगर ( प्रतिनिधी )
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नागरदेवळे (ता. नगर) येथे एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एका व्यक्ती विरोधात दुबार मतदानाचा आक्षेप नोंदविला.
यावेळी भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला. त्यानंतर आमदार तनपुरे मतदान केंद्राबाहेर पडले.
नागरदेवळे (ता. नगर) एका बूथवर बोगस मतदान सुरू असल्याची माहिती आमदार तनपुरे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान मतदानकेंद्रावर धाव घेतली . तनपुरे यांच्या मतदान प्रतिनिधीने एक व्यक्ती दुबार मतदान करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आमदार तनपुरे यांनी विहित नमुन्यात अर्ज करून आक्षेप नोंदविला.
ही बातमी पसरली , व भाजप समर्थक कार्यकर्ते यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली . यावेळी आमदार तनपुरे मतदान केंद्रामध्ये होते. कार्यकर्त्यांच्या जमावाने घोषणाबाजी केली . काही लोकानी मतदान केंद्राच्या शाळेच्या पत्र्यावर दगडफेक केल्याचे कळते . त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगला. त्यानंतर आमदार तनपुरे मतदान केंद्राबाहेर पडले.
दरम्यान , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणी दुजोरा दिला व सांगितले की , लोकशाही मार्गाने शांततेत निवडणूक प्रक्रिया होणार , अशी अपेक्षा अखेर फोल ठरली आहे . नागरदेवळे येथे दुबार मतदारावर आक्षेप नोंदविताना भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर घोषणाबाजी केली. मतदान केंद्र असलेल्या शाळेच्या पत्र्यावर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करतो. याबाबत अधिक माहिती उशिरापर्यंत समजू शकली नव्हती.
Post a Comment
0 Comments